ही मदत नेमकी कोणापर्यंत पोहोचणार आहे?
परळचे KEM रुग्णालय हे गोरगरिबांसाठी शेवटचा आधार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून — खेड्यापाड्यांतून, दूरच्या जिल्ह्यांतून — रुग्ण इथे उपचारासाठी येतात. अनेकांसाठी हा आयुष्यातला पहिलाच मुंबईचा प्रवास असतो.
रुग्णाला आत बेड मिळतो — पण सोबत आलेल्या नातेवाइकांचे काय? ते रुग्णालयाबाहेर फुटपाथवर, पायऱ्यांवर दिवसरात्र थांबतात. उपचारांचा खर्च भागवताना हातात पैसेच उरत नाहीत. अनेकजण दिवसातून एकदाच जेवतात, कधी तेही नाही.
हे पाहून काही माणसे पुढे आली. रोज ठरलेल्या वेळी KEM आणि टाटा रुग्णालयाबाहेर मोठी पातेली येतात — भाजी, चपात्या, एखादे फळ आणि ताक. दररोज शेकडो जणांना हे जेवण मिळते. कोणी जात विचारत नाही, कोणी पावती मागत नाही, कोणी नावही विचारत नाही.
हे काम करणारी एकच संस्था नाही. KEM च्या परिसरात अनेक स्वयंसेवी संस्था, काही मित्रमंडळे, मुंबईचे डबेवाले, तर काही एकट्या-दुकट्या माणसांनी हे व्रत वर्षानुवर्षे चालवले आहे. कोणी रोज सकाळी येते, कोणी आठवड्यातून एकदा. कोणीही त्याची जाहिरात करत नाही — ही माणसे फक्त निमूटपणे जेवण वाढतात आणि निघून जातात.
स्पष्टपणे सांगतो — यांपैकी कोणत्याही संस्थेशी आमचा अद्याप संपर्क झालेला नाही. गणेशोत्सव संपल्यावर आम्ही स्वतः KEM परिसरात जाऊ, हे काम खरोखर करणारी एक संस्था निवडू, जमा झालेली संपूर्ण रक्कम त्यांच्या हातात देऊ — आणि त्या संस्थेचे नाव व पावती याच पानावर सर्वांसाठी जाहीर करू. रक्कम अन्नदानासाठीच वापरली जाईल, हे नक्की. 🙏